अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा;
पारनेर तालुक्यातील शेतकरी त्रस्त
अहमदनगर(प्रतिनिधी)- विद्युत महावितरण शेतकर्यांकडून वीज बिलाची सक्तीने वसुली सुरु करुन, बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप करुन ही पठाणी वसुली थांबविण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी महावितरणचे पारनेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता व तहसिलदार यांना दिले.
शेतकर्यांकडून सुरु असलेली वीज बिलाची पठाणी वसुली न थांबल्यास दहा दिवसानंतर शेतकर्यांसह टाकळी ढोकेश्वर येथील नगर-कल्याण महामार्गावरील महात्मा फुले चौकात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील शेतकर्यांकडून सक्तीने वीज वसुली मोहिम सुरु असून, वीज बिल न भरल्यास त्वरीत कनेक्शन तोडण्यात येत आहे.पारनेर तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो.
येथील शेतकर्यांची विद्युत पंप हे पावसाळ्यात देखील सुरु असतात.शेतकरी वर्ग कोरोना, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या संकटांना तोंड देऊन शेती करत आहे.या संकटातून बाहेर पडत असताना महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली सुरु असून, शेतकर्यांनी शेती करावी कशी व जगावे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी वर्ग कठिण परिस्थितीतून जात असताना शेतात पिक झाल्यावर ते विकून त्यांना पैसे मिळणार आहे.मात्र पिक होण्यापुर्वीच ही सक्तीची वसुलीने शेतकरी वैतागले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
महावितरण कंपनीने टक्केवारी देऊन वसुली चालवली असल्याचा आरोप करुन ही वीज बिलाची पठाणी वसुली व शेतकर्यांचे वीज कनेक्शन तोडणे थांबविण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.