कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयचे सहसचिव सिन्हा यांची जनशिक्षण संस्थेस भेट
व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या युवतींना प्रमाणपत्राचे वितरण
यशोगाथा ठरलेल्या महिलांच्या व्यवसायाची पहाणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी स्वत:चे सामर्थ्य व कौशल्य ओळखून व्यावसायिक प्रशिक्षणाने स्वत:चे विश्व निर्माण करावे. जनशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी संस्थेच्या वतीने दिले जाणारे कौशल्यपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. महिलांनी आलेल्या संकटांना न डगमगता आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयचे (नवी दिल्ली) सहसचिव विजयकुमार सिन्हा यांनी केले.
अहमदनगर येथील जनशिक्षण संस्थेची पहाणी करण्यासाठी शहरात आलेले सिन्हा यांनी संस्थेच्या नालेगाव येथील कार्यालयास भेट देऊन विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेणार्या महिला व युवतींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, औरंगाबादचे संचालक रणधीर गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना सिन्हा म्हणाले की, महिलांनी अद्यावत कौशल्यपुर्ण व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आर्थिक संपन्न बनले पाहिजे.नवनवीन कल्पना शोधून त्याचा वापर व्यवसायात करण्याची गरज आहे. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.जीवनात संकटे येत असतात,आलेली संकटे क्षणिक असतात.
आत्मविश्वासाने संकटांना सामोरे गेल्यास यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण घेता येणार असून, प्रशिक्षण पुर्ण केलेल्यांना यापुढे भारत सरकारचे बोधचिन्ह असणारे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रणधीर गायकवाड यांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व आत्मविश्वास वाढवण्यासाठी कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने हा दौरा आखण्यात आला होता.कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या जाऊन त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले.मात्र व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या महिला या वादळात देखील उभ्या राहून त्यांनी अर्थाजन केले.रोजगार देणे मोठे पुण्याचे कार्य असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य जनशिक्षण संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार यांनी शहरात जनशिक्षण संस्था सन २००५ पासून व्यवसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे.संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून,अनेक महिला व युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चे विविध व्यवसाय उभे केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय थाटलेल्या तृप्ती चोपडा यांनी जन शिक्षण संस्थेने परिवाराच्या सदस्याप्रमाणे आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आल्याचे सांगितले.
शहरात आलेल्या सिन्हा यांनी श्री विशाल गणेश मंदिरात आरती केली.तर जनशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेऊन पार्लर, टेलरिंग, फोटोग्राफी, जर्दोसी काम आदी व्यवसाय थाटलेल्या कविता तडके, विमल दसपुते, संध्या म्हस्के, शुभांगी देशमुख, चिन्मय कुलकर्णी या यशोगाथा ठरलेल्यांच्या व्यावसायिकांच्या दुकानांची पहाणी केली. तर जनशिक्षण संस्थेस भेट देऊन व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या युवतींना प्रमाणपत्राचे वितरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे यांनी केले.आभार कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद यांनी मानले.यावेळी अनिल तांदळे,श्याम शिंदे, प्रशिक्षिका नाजिया शेख, ममता गड्डम, कविता वाघेला, अंजुम शेख, माधुरी सावंत, माधुरी घाटविसावे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती उपस्थित होत्या.