जामखेड (अहमदनगर) : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे, कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार व उद्योजक रोहित पवार नेहमीच, स्वतःच्या मतदारसंघासाठी झटत असतात. रस्ते, शिक्षण, आरोग्य सेवा, पाणी, शेती व महिला सबलीकरण यावर त्यांचे विशेष लक्ष असते. या कार्यात त्यांना मदत करतात त्यांचे वडील कृषिभूषण राजेंद्र पवार व आई सुनंदा पवार.
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून, रोहीत पवार महिला सबलीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत.
याचा प्रत्यय, येत्या 5 मार्च पासून 7 मार्च पर्यंत राबविण्यात येणाऱ्या स्वयंसिद्धा लघु उद्योग मशिनरी प्रदर्शनत कर्जत – जामखेड वासीयांना अनुभवायला मिळणार आहे.
यात, लघु उद्योगांच्या मशिनरींचे भव्य प्रदर्शन, 151 बचत गटांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने कर्ज वितरण , खादी व ग्रामोद्योग विभाग भारत सरकार यांच्या वतीने अगरबत्ती मशीन वाटप, विविध शासकीय योजनांची माहिती व विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या कर्जत – जामखेड येथील महिलांचा आणि आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस सन्मान सोहळा असा भरगच्च तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्था अंतर्गत असणाऱ्या 151 गटांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून, 1कोटी 51 लाख रुपये एवढे भरगोस कर्ज ही यावेळी बचत गटांना विविध उद्योग व्यवसाय उभारणीसाठी मिळणार आहे.
जामखेड येथील राज लॉन्स येथे हे तीन दिवसीय लघु उद्योग मशिनरी प्रदर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असून बचत गटांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या पदार्थ, वस्तूंचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कर्जत – जामखेड मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :
5 मार्च – सकाळी 10.00 वाजता, मशिनरी उद्घाटन व उपस्थित महिलांना मार्गदर्शन
6 मार्च – 151 गटांना 1कोटी 51 लाख कर्ज वाटप व खादी ग्रामउद्योगामार्फत मिळालेल्या अगरबत्ती मशीनींचे वाटप
7 मार्च – जागतिक महिला दिनानिमित्त कर्जत जामखेड मधील प्रतिकूल परिस्थिती उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असून दुपारच्या सत्रात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका यांचाही सत्कार आमदार रोहित पवार व सौ कुंती ताई पवार यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
कोरोनविषयक शासनाचे असणारे सर्व नियम पाळून हे कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी मशिनरी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.