मागील दोन महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिला संतप्त

- Advertisement -

मागील दोन महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिला संतप्त

पाणी प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे मनपा पाणी पुरवठा विभाग प्रमुखांना निवेदन

काटवन खंडोबा रोड, गाझी नगरचा पाणी प्रश्‍न पेटला

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन महिन्यापासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने निर्माण झालेला पाणी प्रश्‍न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांची भेट घेऊन निवेदन दिले.

माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव व उपस्थित महिलांनी पाणी प्रश्‍नाचा पाढा संबंधित अधिकाऱ्यांपुढे वाचला. परिमल निकम यांनी पाण्याची लाईन चेक करुन सदर प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी हसीना शेख, सकीना शेख, तायरा शेख, शाहीन शेख, शमीम इनामदार, कमल दातरंगे, कौसर पठाण, आयशा बागवान, शमा बागवान, मुन्नी शेख, अमिना शेख, कमल इंगळे, शहनाज शेख, नसीम शेख, इर्शाद सय्यद, जबीन बागवान, परविन बागवान आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

प्रभाग क्रमांक 15 मधील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर भागात मागील दोन ते तीन महिन्यापासून पाण्याचा प्रश्‍न भेडसावत असताना, नळाद्वारे पूर्ण दाबाने पाणी येत नाही व पुढील भागातील नागरिकांच्या नळांना पाणी येत नसल्याने महापालिकेची पाणीपट्टी भरुन देखील पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.

पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरवर विसंबून रहावे लागत आहे. टँकर देखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याने महिला व लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सदर परिसरात सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक राहत असल्याने त्यांना दररोज पिण्यासाठी पाणी विकत घेणे परवडत नाही. या भागातील पाण्याचा प्रश्‍नाबाबत वारंवार तक्रारी करुन देखील संबंधित पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दखल घेत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन इंचीच्या लाईनमधून सर्वांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली असून, दोन इंचीच्या लाईनमधून एवढ्या मोठ्या लोकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. तसेच मोजक्या ठिकाणीच पाणी सोडण्याचे वॉल असल्याने मुख्य लाईन असलेल्या रस्त्यावरील घरांना तीन-तीन तास पाणी पुरवठा सुरु असतो. मात्र आतील भागातील घरांना अर्धा तास देखील पुरेश्‍या दाबाने पाणी येत नाही, तर पुढील भागातील नळातून थेंबभर पाणी मिळणे कठिण झाले आहे. या ठिकाणी मोठी पाईपलाइन टाकून किंवा नवीन पाणी सोडण्याच्या वॉलचे नियोजन केल्यास सर्वांना पुरेश्‍या दाबाने पाणी मिळणे शक्य होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत असताना सर्वांच्या संतप्त भावना असून, नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ आणू नये. तरी महापालिका प्रशासनाने या पाणी प्रश्‍नाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles