व्यक्तीच्या पश्चात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य जिवंत राहते – ह.भ.प. झेंडे महाराज
अहमदनगर प्रतिनिधी – केडगाव येथील माणुसकी फाऊंडेशनला साबळे परिवाराच्या वतीने कै. अशोक गोविंद साबळे यांच्या स्मरणार्थ मोक्ष वाहिनी रथ देण्यात आले. वर्षश्राध्दच्या धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड देत साबळे परिवाराने हा उपक्रम घेतला.संजय साबळे, राजू साबळे व साबळे कुटुंबीयांनी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल महाराज कोतकर यांच्याकडे मोक्ष वाहिनी रथ सुपुर्द केले.
यावेळी ह.भ.प. झेंडे महाराज, भाकरे महाराज, नगरसेवक अमोल येवले, संजय साबळे, जालिंदर दराडे, राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.
ह.भ.प. झेंडे महाराज म्हणाले की, जीवनात किती पैसा कमावला? यापेक्षा किती गरजूंना मदत केली हे महत्त्वाचे आहे. मरणानंतर सर्व काही भूतळावरच राहणार असून, व्यक्तीच्या पश्चात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य जिवंत राहते. माणुसकी फाऊंडेशन देखील गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे लग्न लावणे, कोरोना काळात अन्नछत्र चालवून भुकलेल्यांना जेवण तर अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.
समाजाचे देणे लागते ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. माणुसकी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांना मोक्ष वाहिनी रथाची आवश्यकता भासेल त्यांनी माणुसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल महाराज कोतकर (मो.नं. 9225252527) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.