पूर्व वैमानस्यातून शेतकरी कुटुंबाचा रस्ता अडविला
रस्ता अडविणार्यावर कारवाई करण्याची शेख कुटुंबीयांची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – पूर्व वैमानस्यातून वहिवाटीचा शासकीय रस्ता बंद करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी माणिकदौंडी येथील शेतकरी जावेद अंबीर शेख यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संपूर्ण कुटुंबाला रस्ता वापरण्यास मज्जाव होत असल्याने मुलांना शाळेत जाण्याचा, जनावरांच्या चार्याचा, शेती करण्याचा व आई-वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रश्न बिकट बनला असल्याचे शेख यांनी म्हंटले आहे.
माणिकदौंडी (ता. पाथर्डी) येथे जावेद अंभीर शेख यांचे कुटुंबीय मागील चार पिढ्यापासून राहत असून, शेतीने उदरनिर्वाह करत आहे. त्यांना शेतात व घरी जाण्यासाठी शासनाचा माणिकदौंडी इजीमा 191 ते शेळके मोरे वस्ती हा ग्रामीण मार्ग क्रमांक 103 असून उपलब्ध आहे. स्वतःच्या मालकीच्या शेतावर घरात जाण्यासाठी मुनीर बादशाह शेख, निसार मेहताब शेख, हुसेन मेहताब शेख, आयाज निसार शेख (सर्व रा. माणिकदौंडी) यांनी रस्त्याचा वापर करण्यासाठी मज्जाव केला आहे. हा रस्ता वापरल्यास त्यांच्याकडून धमक्या दिले जात आहे. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे 19 जून रोजी संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याचा राग मनात धरून सदर व्यक्तींनी संपूर्ण कुटुंबाला हा शासकीय रस्ता वापरण्यास बंद केला आहे. सदर रस्त्याने गेल्यास कुटुंबातील महिला, शालेय मुले यांना शिवीगाळ करुन धमकाविण्यात येत असल्याचा आरोप तक्रारदार शेख यांनी केला आहे.
वारंवार शिवीगाळ व धमकाविले जात असताना संपूर्ण कुटुंब दहशतीखाली असून, मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. शेती करताना व जनावरांच्या चार्याचा प्रश्न देखील बिकट बनला आहे. आई-वडिलांना रुग्णालयात उपचारास समस्या निर्माण होत आहे. सदर वापरासाठी एकच रस्ता असून, तो मार्ग सदर व्यक्तींकडून आडविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करून सदरचा रस्ता खुला करुन देण्याची मागणी शेख यांच्या शेतकरी कुटुंबाने केली आहे. निवेदनावर आयेशा शेख, मुस्कान शेख, आलम शेख, मुख्तारबी शेख, अय्युब शेख, आसिफ शेख, हिना शेख आदी कुटुंबातील सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.