मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील
नगर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या पर्वाची ही वाटचाल सुरू आहे. याच धर्तीवर मला अनु. क्र. ३ मिळाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनु. क्र. ३ चे बटन दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी नगर मध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग वाढविला आहे. नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशाच संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे. यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. आणि हा नियतीचा योगायोग आहे की, त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचे बटन मिळाले आहे. यामुळे आता विजयांची चिंता उरली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचे ध्येय मी उराशी बांधले आहे. म्हणुन तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षिदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनु क्रं ३ चे बटण दाबावे असे त्यांनी सांगितले. सदर संवाद सभेत जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.