मोहंमद पैगंबर जयंती निमित्त टकटी दरवाजा येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर जयंती (ईद ए मिलाद) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे. यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील आस्तंबूल या गावाचा समावेश आहे. नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत महंमद पैगंबराच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे. इराक व इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस आनले असून, परंपरेनुसार फक्त मोहंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती पुजारी सय्यद बुर्हाण यांनी दिली.
यावेळी मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, फुलांची सजावट करण्यात आली आहे.याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणुक काढण्यात येवून, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप झाले.