अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रेत्यांची तक्रार केल्या प्रकरणी मारहाण तर पोलीस स्टेशनला छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा तक्रादाराचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गावातील अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रेत्यांवर कारवाई होण्याची तक्रार केल्याप्रकरणी मारहाण करुन महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी व्हावी व येसवडी (ता. कर्जत) येथील अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन संदीप कांबळे यांनी आपल्या कुटुंबीयांसह पोलीस अधिक्षकांना दिले.तर अवैध हातभट्टी व दारु विक्रेते व कर्जत पोलीसांनी संगनमत करुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
येसवडी (ता. कर्जत) गावातील अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रेत्यांची तक्रार केल्याप्रकरणी संदीप कांबळे यांना मारहाण झाली होती.ते 6 ऑक्टोंबर रोजी कर्जत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही.त्यांना पोलिसांनी उपचार घेण्यासाठी कर्जत ग्रामीण रुग्णालयमध्ये पाठविले.
तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सिटीस्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. मात्र तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट त्यांच्याविरुध्द रात्री उशीरा कलम 354 प्रमाणे छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी कर्जत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता एका पोलीसाने दारूचा मुद्दा बदलण्यासाठी विनंती केली. पोलीसांना खूप विनंती केल्यानंतर संदीप कांबळे यांच्या फिर्यादीवरुन घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चंदर कांबळे, निलेश कांबळे, महेश कांबळे (सर्व रा. येसवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली. पोलीसांना अवैध दारू धंद्याचे हप्ते सुरु असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.गुन्हा दाखल केल्याचा राग येऊन सदरचे अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रेत्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
उपचार घेत असताना दाखल करण्यात आलेल्या छेडछाडीच्या गुन्ह्याचा तपास करावा व गावातील अनाधिकृत हातभट्टी व दारु विक्रीवर कारवाई करण्याची मागणी संदीप कांबळे यांनी केली आहे.सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास कुटुंबीयांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.