योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली देणगी – प्राचार्य उल्हास दुगड
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- योग ही भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेली देणगी आहे. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही तर, स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरुपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे. आपली जीवनशैली बदलून चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून रोजी साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन प्राचार्य उल्हास दुगड यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त पद्धतीने धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दुगड बोलत होते.
डॉ. अभय मुथा व ललित वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना विविध आसनाच्या प्रात्यक्षिकासह योग व प्राणायमाचे धडे दिले. या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा अध्यापक कैलास साबळे यांनी प्रास्ताविकात योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आशा सातपुते, बाळासाहेब वाव्हळ, विष्णू गिरी उपस्थित होते. आभार क्रीडा अध्यापक कैलास करपे यांनी मानले.