दीडशेपेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग
विविध सामाजिक उपक्रमास युवकांसह ग्रामस्थांचा प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संदेश घेऊन टाटा व्हालिंटरींग सप्ताहातंर्गत मौजे कौडगाव (ता. नगर) येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. कोरोनाकाळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.पंचक्रोशीतील युवक व ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरीश दळवी यांच्या हस्ते झाले.शिबिरात पहिले रक्तदाते म्हणून बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दाब्रिओ यांनी रक्तदान करुन या शिबीराची सुरुवात केली.
डॉ.गिरीश दळवी म्हणाले की,मनुष्याचे रक्त कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने मनुष्य रक्तासाठी मनुष्यावरच अवलंबुन आहे.कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.रक्तदान ही काळाची गरज बनली असून, सामाजिक बांधिलकी ठेऊन प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर टाटा पॉवर व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात फादर जॉर्ज दाब्रिओ यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करुन संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. टाटा पॉवरचे समाज विकास अधिकारी विश्वास सोनवले यांनी टाटा समूह सामाजिक बांधिलकी जपून विविध क्षेत्रात योगदान देत आहे.
टाटा व्हलिंटरिंग सप्ताहाच्या माध्यमातून पीक पाहणी, वृक्षारोपण, जैवविविधता सर्वेक्षण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आदी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देऊन, या कार्यक्रम मागची भूमिका व उद्देश विषद केला. प्रवीण वाघ यांनी टाटा व्हलिंटरिंग सप्ताहामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला असल्याचे सांगितले.
यावेळी अगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाबासाहेब खर्से, रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे, कौडगावचे उद्योगपती मंजाबापू घोरपडे, पॉवरकॉन कंपनीचे माळी आदी उपस्थित होते.
या शिबीरास अहमदनगर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांसह टाटा पॉवर, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, पॉवरकॉन, विंडवर्ल्ड, द टेक हबच्या कर्मचार्यांनी रक्तदान केले. तर बचत गटाच्या महिलांनी देखील रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवला.दिडशेपेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या या शिबीरातून संकलित करण्यात आल्या.
शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.राजेंद्र पवार, संदीप गुंड, कौडगाव ग्रामपंचायतचे डॉ. विलास घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, संदीप बेरड, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी, कौडगावचे अशोक कांडेकर, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे उपसंचालक नेल्सन मुदलियार, प्रकल्प अधिकारी अर्जुन शरणागाते, टाटा पॉवरचे प्रवीण शेंडकर, अक्षय परब, कुणाल माळी, जयेश कोळी यांनी परिश्रम घेतले. दिनेश शेरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.