मातंग समाजाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने नाराजीचा सूर
राजकीय पक्षांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा बैठकीत निर्णय; शिर्डीत उमेदवार देण्याची घोषणा
मातंग समाजाचा विचार करावा अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होणार -साहेबराव पाचारणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी राज्यातील एकाही मातंग समाजातील एकही उमेदवार दिला नसल्याने शहरात झालेल्या मातंग समाजाच्या बैठकीत नाराजीचा सूर उमटला. तर शिर्डी मतदार संघात समाजाच्या वतीने उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सत्तेच्या समिकरणात मातंग समाजाला फक्त निवडणुकांपुरते वापर करण्याचा काम करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला.
सिध्दार्थनगर येथे झालेल्या या बैठकीसाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव चांदणे, अखिल विश्व वारकरी परिषदेचे अध्यक्ष साहेबराव पाचारणे, सुनील सकट, सुनील राजगुरू, दिलीप सोळसे, किरण उमाप, आशाताई ससाणे, इंजि. देवराम वैरागर, विजुभाऊ पठारे, सुनंदा भोसले, सुनील राजगुरू, दीपक चांदणे, राणी उमाप, कचरादास साळवे आदींसह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
साहेबराव पाचारणे म्हणाले की, सर्व पक्षातील नेत्यांनी मातंग समाजाचा विचार करावा अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे 48 खासदार आहेत. त्यापैकी एकही जागा मातंग समाजाला दिलेली नाही. समाजावर एक प्रकारे अन्याय करण्यात आला आहे. शिर्डी लोकसभेच्या राखीव मतदार संघात मातंग समाजाचे जास्त मतदान असताना देखील कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. मेहेतर व बौद्ध समाजाला देखील मेदवारी पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शिर्डी मधून मातंग समाजाच्या उमेदवाराचा स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. राज्यात सर्व पक्ष जातीचे राजकारण करीत असून, पूर्वी गावकुसा बाहेर राहणाऱ्या मातंग समाजास उमेदवारी न देता त्यांना सत्तेपासून वंचित ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नामदेव चांदणे म्हणाले की, मातंग समाजाचा विचार केला जात नसल्याने, लोकसभेच्या नगर दक्षिणच्या मतदार संघात समाज वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षाने कोणत्याही मागासवर्गीय समाजातील नेत्यांना उमेदवारी दिलेली नाही. सर्व पक्षाने मातंग, मेहेतर व बौद्ध समाजावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रात राजकारणापासून मातंग समाजास निवडणुकीपासून वंचित ठेवल्याने डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी पुणे येथे आत्मक्लेष आंदोलन केले. तरी कोणत्याही पक्षाने याची दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाचा विचार न केला गेल्यास मतदानावर बहिष्कार किंवा वेगळा विचार करण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
- Advertisement -