राजर्षी शाहू महाराजांनी वंचितांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी : मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार
अहमदनगर : राजर्षी शाहू महाराजांनी समाजामधील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या विचारातून व प्रेरणेतून आज प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार यांनी केले. २६ जुन – राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमीत्त स्व रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने बाबावाडी वसतिगृहातील मुलांना श्री. पवार यांच्या हस्ते शालेय साहित्य व दैनंदीन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कार्य काळात अनेक सामाजिक सुधारणा सुरू केल्या. शिक्षण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यांचा उद्देश होता. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. विविध जाती आणि धर्मांसाठी स्वतंत्रपणे वसतिगृहे स्थापन केली. त्यांच्या प्रेरणेतुन आज बाबावाडी वसतिगृहातील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. ही बाब प्रशंसनीय आहे.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक व स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फाउंडेशन चे अध्यक्ष अभय ललवाणी, महावीर ललवाणी, बाबावाडीच्या अधीक्षिका सुमनताई कांबळे, उल्हास नांगरे, गणेश भंडारी, ऋषिकेश ललवाणी व मुले उपस्थित होते.