कोरोना काळात दिलेल्या सेवेद्दल समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार तर मानद डॉक्टरेट पदवी प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिकंदर अजीज शेख यांना वाहतुक सुरक्षा दल व नागरी संरक्षण सेवा संस्थेतील विशेष कामाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कोरोना योध्दा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महात्मा गांधी ग्लोबल पिस फाऊंडेशन व निती आयोगाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देऊन मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
पुरस्कार प्रदान सोहळ्यास संस्थेचे संचालक डॉ. मनिलाल शिंपी, महासमादेशक डॉ. अरविंद देशमुख, उपस्थित होते. शेख यांनी कोरोना काळात सलग 45 दिवस जीवाची पर्वा न करता रस्त्यावर बंदोबस्त व सुरक्षा विषयी सेवा दिली होती.तसेच कोरोना काळात गरजू घटकांना मदतीचा हात दिल्याने त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
शेख यांचे मुळगाव नेवासा तालुक्यातील फत्तेपूर असून, ते शेवगाव तालुक्यातील नवजीवन विद्यालय दहिगावने येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आरएसपी चे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी शिक्षक म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सेवाभावी कार्यात ते सतत अग्रेसर असतात. त्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. डॉ.नरेंद्र घुले पाटील, मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, पदवीधर आमदार डॉ. सुधिर तांबे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.