लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्यानिमित्त शहरात बैठक
गुरुवारच्या राज्यव्यापी दवंडी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
संघर्ष करुन न्याय पदरात पाडून घेण्यासाठीचा लढा -कैलास खंदारे
अहमदनगर प्रतिनिधी – लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या कार्याचा आढावा घेऊन, गुरुवारी (दि.20 जुलै) आझाद मैदानावर मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर आयोजित केलेल्या दवंडी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे, लखन साळवे, नवनाथ शिंदे, संतोष उमाप, अभिजीत सकट, अमोल गाडेकर राजाराम काळे आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे म्हणाले की, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यव्यापी कार्यकर्ता संपर्क संवाद दौरा सुरु आहे. या दौर्यानिमित्त राज्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून समाजातील प्रश्न जाणून घेतले जात आहे. तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दवंडी मोर्चात लहूजी शक्ती सेना सक्रीय सहभागी होणार असून, या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबीत असून, कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी समाजाला न्याय मिळाला नसून, संघर्ष करुन न्याय पदरात पाडून घेण्यासाठीचा हा लढा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात लहुजी शक्ती सेनेचे उत्तमपणे संघटन असून, मोठा युवा वर्ग संघटनेला जोडला गेलेला आहे.समाजाच्या प्रश्नांवर हुंकार भरण्यासाठी आयोजित मोर्चात अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जातीला अ, ब, क, ड वर्गवारी नुसार आरक्षण मिळावे, क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारावे, समाजाच्या विकासाला चालना देण्यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या जाचक अटी रद्द करून करावे, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीवर वाढते अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या आदी विविध समाजातील मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन केले गेले असल्याचे लहुजी शक्ती सेनेच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.