राज्यस्तरीय सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेच्या जिल्हा निवड चाचणीला प्रारंभ
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीला सोमवार (दि.06 मे) भुईकोट किल्ला मैदान येथे प्रारंभ झाले आहे. या निवड चाचणीद्वारे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
असोसिएशनचे सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंची निवड होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करण्यात आले असून, त्यांना जॉय जोसेफ व राजू पाटोळे प्रशिक्षण देणार आहे. 20 मे रोजी जिल्ह्याचा संघ जाहीर होणार असून, यामध्ये 18 खेळाडूंचा समावेश असणार आहे.
23 ते 29 मे दरम्यान शिरपूर (जि. धुळे) येथे जिल्ह्याचा संघ राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडीसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होत आहे. यामध्ये 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2012 दरम्यान जन्मलेल्या मुलांना सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.