कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तहसील कार्यालयसमोर भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी यांच्या वतीने आज आंदोलन करून, राज्यातील महा विकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला,तसेच या समाजावरील अन्याय दूर केला नाही तर पुढील काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामध्ये भटके-विमुक्त आघाडीचे भाजपचे प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने,तालुका अध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे,ज्ञानदेव लष्कर,सोयब काझी,सुनील यादव,पप्पू शेठ धोदाड,सचिन माने,हेमंत जाधव यांच्यासह भटक्या समाजातील वेश परिधान करून अनेक बांधव सहभागी झाले होते.
राज्यातील भटके विमुक्त जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या पदोन्नती बाबत महाविकासआघाडी ने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून भटक्या-विमुक्तांना आरक्षण देणे असविधानिक आहे.असे म्हटले आहे याचे तीव्र पडसाद आज सर्वत्र उमटले आहेत.
आज कर्जत तहसील कार्यालयासमोर भटक्या विमुक्त जाती जमाती व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने राज्याचे प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलकांनी पोतराज यासह भटक्या जमातीचे इतर सर्व नागरिक एकत्र येत त्यांनी त्यांचे पारंपरिक नृत्य सादर करत महाविकास आघाडी चा निषेध केला व कोणत्याही परिस्थितीमध्ये भटके विमुक्त जाती-जमातीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदोन्नती आरक्षण कायम ठेवावी अशी मागणी केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश सदस्य तात्यासाहेब माने म्हणाले की,राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार हे भटके विमुक्त जाती जमाती च्या विरोधात असून त्यांनी जाणीवपूर्वक या जातीतील अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारे नोकरीतील पदोन्नती रद्द करण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.मात्र हे प्रतिज्ञापत्र त्यांनी मागे घेतली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू.
वास्तविक पाहता राज्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार आल्यापासून गोरगरीब नागरिक शेतकरी महिला व इतर सर्व जाती धर्माच्या लोकांवर अन्याय व अत्याचार सुरू आहेत, ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने जाणीवपूर्वक रद्द केले आहे.अशा पद्धतीने ठराविक समाजाला वर्चस्व निर्माण करू देण्यासाठी हे सरकार अठरापगड जाती नेस्तनाबूत करण्याचे काम करीत आहेत असाही आरोप माने यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील गावडे म्हणाले की,महाविकासआघाडी ने भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर व संपूर्ण जमातीवर अन्याय करणारे धोरण घेतले आहे या समाजाला असणारे तुटपुंजे आरक्षण नाही.महाविकास आघाडी ने काढून घेतले आहे.ही बाब अतिशय संतापजनक आणि वाईट आहे.हे सरकार राज्यामध्ये अनेक चुकीचे पायंडे पाडताना दिसून येत आहे.
राज्यातील ओबीसीं याचप्रमाणे इतर सर्व मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्याचे धोरण या सरकारने आखले आहे आणि याचा भाजपच्या वतीने आम्ही निषेध करतो व आगामी निवडणुकांमध्ये सर्व मागासवर्गीय बांधव राज्यातील महाविकास आघाडीला धडा शिकवतील असे डॉक्टर गावडे यावेळी म्हणाले.
भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यावेळी बोलताना म्हणाले की भटके विमुक्त मधील बहुतेक जातीचा अनुसूचित जाती जमाती मध्ये समावेश व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी असताना तो समावेश न करता या जाती साठी असणारे नोकरीतील आरक्षण देखील या सरकारने काढून घेत खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यांमध्ये सर्व मागासवर्गीय समाज यांवर अन्याय सुरू केला आहे,मागासवर्गीय समाजाची देखील नोकरीतील आरक्षण या आघाडी सरकारने रद्द केले आहे तर आता भटक्या-विमुक्तांची या सरकारने आरक्षण रद्द केल्यास या विरोधात तीव्र लढा उभा केला जाईल .
ज्ञानदेव लष्कर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. तहसीलदार नानासाहेब बागडे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर करावे असे आश्वासन दिले.