आर्थिक विवंचनेपोटी कर्मचार्यांच्या आत्महत्या होत असताना तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – राज्य परिवहन कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महामंडळातील संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या वतीने परिवहन विभागाच्या सर्जेपुरा येथील विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले.
या उपोषणात कामगार संघटनेचे विभागीय सचिव डी.जी. अकोलकर, अध्यक्ष शिवाजी कडूस, सचिव नितीन येणे, कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष गणेश फाटक, इंटकचे विभागीय सचिव सुरेश चौधरी, विभागीय अध्यक्ष दिनकर लिपाणे, कास्ट्राईबचे सुलाखे पाटील, शशिकांत वाकचौरे, सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, उत्तम रणसिंग, रोहिदास अडसूळ, संजय मिसाळ, विष्णू घुले, महिला प्रतिनिधी रजनी साळवे आदी सहभागी झाले होते.
कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावून एस.टी. कर्मचार्यांनी कर्तव्य बजावले.तरी देखील हे कर्मचारी दुर्लक्षित राहिले आहे.कोरोना काळात 306 कर्मचारी कोरोनाने मयत झाले.तर राज्यात जवळजवळ 30 कर्मचार्यांनी आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्या केलेल्या आहेत. तरी देखील राज्य परिवहन कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नाईलाजाने सर्व संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून 27 ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत उपोषण करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे राज्य परिवहनच्या कर्मचार्यांना 28 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा, मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्ता 7, 14, 21 टक्के वरून 8, 16, 24 टक्के करण्यात यावा,वेतन वाढीचा दर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे दोन टक्के वरून तीन टक्के लागू करावा,अग्रीम उचल शासनाच्या नियमाप्रमाणे 12 हजार 500 दिवाळीपूर्वी देण्यात यावी, दिवाळीचा बोनस रुपये 15 हजार देण्यात यावा, मासिक वेतन नियोजित तारखेस करण्याची मागणी संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.