राहुरीच्या सावित्रीच्या लेकी क्रिकेटमध्ये राज्यात प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (अमरावती) तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे सुरू असलेल्या शासकीय राज्य शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरीच्या मुलींच्या संघाने राज्यात विजेतेपद पटकावले.
17 वर्षे वयोगट आतील मुलींच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करून मुंबई विभाग, नागपूर विभाग, कोल्हापूर विभाग व अंतिम सामन्यात अमरावती विभागाचा 30 धावांनी पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक व क्रिकेट प्रशिक्षक घनश्याम सानप तसेच टेनिस बॉल जिल्हा संघटनेचे सचिव अविनाश काळे यांनी मार्गदर्शन केले.
या संघात कर्णधार म्हणून संतोषी भिसे, उपकर्णधार मृणाल ननवरे, श्रेया सोनवणे, नशरा सय्यद, राशी पवार, प्रणाली पानसंबळ, लक्ष्मीप्रिया म्हसे, श्रावणी अडसुरे, आकांक्षा सातदिवे, अमृता ढगे, श्रद्धा खंडागळे या विद्यार्थिनींचा समावेश होता. खेळाडूंच्या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव महानंदजी माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपहिरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बाबा, प्राथमिकचे मुख्याध्यापक खेत्री, सर्व शिक्षक वृंद व पालकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -