मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटी महत्त्वाची भूमिका बजावेल – भदंत सचित बोधी
अहमदनगर प्रतिनिधी – मनुष्यमात्राच्या कल्याणासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटी महत्त्वाची भूमिका बजावेल. तर समाजाला एक दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. बौद्धांच्या धार्मिक सामाजिक आणि आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटी स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन पूज्य भदंत सचित बोधी यांनी केले.
रेल्वे स्टेशन रोड, भिमराज बुद्ध विहार येथे तथागत बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना फलकाचे अनावरण करुन करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सचित बोधी बोलत होते.
यावेळी दीपक अमृत, आण्णासाहेब गायकवाड, बुध्दिष्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, प्रकाश कांबळे, शांताराम बनसोडे, मिलिंद आंग्रे, अविनाश कांबळे, सत्येंद्र तेलतुंबडे, दिपक गायकवाड, छोटु कसबे आदी बौद्धाचार्य उपस्थित होते.
तथागत बुध्दिस्ट सोसायटीच्या माध्यमातून धम्म मेळावे, धम्म दिक्षा, श्रामणेर शिबीर, युवक-युवती शिबीर, उपासक-उपासिका शिबीर, आरोग्य शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन, गरजू घटकांना मदत, भिक्खू निवास, प्रशिक्षण केंद्र, शैक्षणिक उपक्रम आदी सामाजिक कार्य राबविण्यात येणार आहे. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामधील गरजू घटकांना आधार देण्यासाठी व प्रबुद्ध मानव घडवण्यासाठी ही संस्था योगदान देणार असल्याची अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र तेलतुंबडे यांनी व्यक्त केली.
बुध्दिष्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी नोंदणीकृत असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाणार आहे. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज दिनी या संस्थेची नोंदणी करण्यात आली. धम्म एका जातीपुरता मर्यादित न राहता मानव जातीच्या कल्याणासाठी असून, या भावनेने समाजात कार्य केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.