रेशनिंगच्या धान्यात दुकानदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने काळाबाजारचा आरोप
दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बोचुघोळ यांची मागणी
त्या दुकानदार विरोधात तक्रार अर्ज पाठविण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात रेशनधारकांना धान्याचे वाटप केले गेले नसून, रेशनिंगच्या धान्यात दुकानदार व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा काळा बाजार सुरु असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला आहे. तर या प्रकरणी तातडीने चौकशी करुन दोषी अधिकारी व दुकानदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन बोचुघोळ यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांना दिले आहे.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये धान्य वाटपाची टक्केवारी खूप कमी होती. या पुढील महिन्यात हे अचानक वाढून टक्केवारी मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. दोन महिन्यांमध्ये वाटप कमी झाले असून, अचानक एवढे लोक धान्य घेऊन का गेले नाहीत? याची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य रेशनधारकांना नागरिकांना त्यांचे धान्य वेळेवर व पूर्ण मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याप्रकरणी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा करुन देखील या प्रकरणी सुधारणा होत नसून, रेशनिंग धान्याच्या वाटपात मोठी अनागोंदी असल्याचे बोचुघोळ यांनी म्हंटले आहे. ज्या रेशनधारक ग्राहकांना दुकानदारांकडून धान्य मिळत नाही, अंत्योदय ग्राहकांना नियमाप्रमाणे लाभ मिळत नाही, धान्य दुकानदार पावती बिल देत नाही, रेशनकार्ड मध्ये नाव असून सुद्धा दुकानदार धान्य कमी देत असेल किंवा अपमानास्पद वागणुक देणे, फोन न उचलणे व नियमित दुकान न उघडणे अशा दुकानदार विरोधात तक्रार अर्ज 9373888869 या नंबरवर व्हॉट्सअप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.