लंके यांनी घेतले अण्णा हजारे यांचे आशीर्वाद
गावागावापर्यंत केलेल्या संपर्काचे अण्णांना आश्चर्य
राळेगणसिद्धी : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी येथे येत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
लंके यांनी निवडणूक प्रक्रिया दरम्यान राबविलेल्या यंत्रणेबाबत हजारे यांना माहिती दिली. दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मतदार संघातील गावा गावात संपर्क केल्याचे लंके यांनी सांगितल्यानंतर इतक्या मोठ्या मतदार संघात केलेल्या संपर्काविषयी हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. हजारे म्हणाले सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता असून उन्हाची काळजी घेऊन प्रचार करा असा सल्ला हजारे यांनी लंके यांना दिला.
हजारे म्हणाले आमदार म्हणून काम करताना नीलेश लंके यांनी गेल्या साडेचार वर्षात भरीव काम केले आहे. मतदारसंघातील जनतेपुढे त्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पारनेर तालुक्याचा प्रतिनिधी लोकसभेत जाण्याची यंदा संधी आहे. संधीचे सोने करा असा सल्ला अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.
- चौकट
गैरसमज पसरविणे चुकीचे
अलीकडेच या निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे हे आपल्या भेटीला आले होते. निवडणुकीतील सर्वच उमेदवार आपल्या भेटीसाठी येतात. आपण त्यांना आशीर्वाद देतो, परंतु विखे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आपले विखे यांना समर्थन असल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. हे योग्य नाही. गैरसमज पसरविणे चूकीचे नसल्याचे सांगत हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.