लक्ष्मीदर्शन सुरू झालंय, तिच्याकडे पाठ फिरवू नका !
नीलेश लंके यांची राहुरी येथे सभा
राहुरी : प्रतिनिधी
मतदारसंघात लक्ष्मीदर्शन सुरू झाले आहे. लक्ष्मीकडे पाठ करू नका. गरीबाघरचं लग्न नाही. तिकडून घ्या, राहिलं थोडं फार तर माझ्याकडेही पाठवा. मत मात्र तुतारीलाच द्या असे सांगत आ. नीलेश लंके यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
लंके यांच्या प्रचारार्थ राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत लंके हे बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, हर्ष तनपुरे, नितेश कराळे, शहराध्यक्ष संतोष आघाव, सुर्यकांत भुजाडी, शिवसेनेचे सचिन म्हसे, बाळासाहेब आढाव, सर्व सेवा संस्थांचे संचालक, सर्व नगरसेवक यांच्यासह मोठया संख्येने नागरीक यावेळी उपस्थित होते.
लंके म्हणाले, ज्यांना पाच वर्षापूर्वी आपण संसदेत पाठविले त्यांनी काय दिवे लावले ? शेतकऱ्याचा, समाजहिताचा एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही. मतदारसंघातील विकास कामेही केली नाहीत. दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूर करण्याची त्यांना सवय आहे. दुसऱ्याने मंजुर केलेल्या कामाचे भुमिपुजन करण्याचे उद्योग ते करत असल्याचा आरोप लंके यांनी केला.
लंके म्हणाले, निवडणूकीला समोरे जाताना त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलले पाहिजे. मात्र भाजपाच्या निष्क्रीय खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आहे. जनतेमध्ये कसे जायचे हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर दाळ, साखर वाटण्याची वेळ आली. नगर-मनमाड रस्ता त्यांना करता आला का ? काम सांगण्यासाठी ते व्यक्तीगत टिका टिपन्नी करतात. माझं नातं शेतकऱ्यांशी, गोरगरीबांशी आहे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी २४ तास काम करण्याचा शब्द देतो अशी ग्वाही लंके यांनी दिली.
▪️ चौकट
मोदींनी किडण्याच विकायच्या ठेवल्या आहेत
मोदींनी बंदा देश विकायला काढला असून आता त्यांनी तुमच्या किडण्याच विकायच्या ठेवल्या आहेत. आपण एका अशिक्षीत माणसाला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसविल्यापासून ते थापा मारण्यापलीकडे काहीही करत नसल्याचे नीतेश कराळे यांनी सांगितले. २०१४ मध्ये त्यांनी महागाईच्या विषयावर मते मागून सत्ता मिळविली. दहा वर्षानंतर महागाईची काय स्थिती आहे. महागाई पाहता मोदी सरकार हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
▪️चौकट
मोदी प्रसिध्दीसाठी हपापलेेले
मोदी अहंकारी आहेत. प्रसिध्दीसाठी हपापलेले आहेत. कोरोना लस घेतल्यानंतरच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो, मृत्यू प्रमाणपत्रावर फोटो, जनतेच्या पार्श्वभागावर फोटो लावायचे राहिलेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी सव्वा सहा लाख रूपये खर्चून मोदींनी सेल्फी पॉईंट काढले आहेत. दुसरीकडे ते स्वतःला फकीर म्हणून घेतात. आता त्यांनी जनतेच्या गळयात एखादी झोळी टाकून फकीर करावं अशी उपहासात्मक टीका नीतेश कराळे यांनी यावेळी केली.
▪️चौकट
कोरोना काळात लंके एकटेच मैदानात
गोरगरीबाचं पोरग पुढे आणण्याचं काम शरद पवार यांनी केले आहे. गोरगरीबांचा, जनसामान्यांचा उमेदवार नीलेश लंके आहे. कोरोना संकटात सगळे घरात बसून होते त्यावेळी हा एकटाच माणूस मैदानात उतरून कोरोनाच्या विरोधात लढत होता. तुम्हाला लंके यांना निवडूण द्यावेच लागेल. विखे यांच्या घरात पन्नास वर्षांपासून सत्ता आहे. मागचे पाच वर्षे ते खासदार होते. नगर-मनमाड महामार्गावर ४०० ते ५०० लोकांची बळी गेले. खड्डयात वाहने अदळल्याने अनेकजण जायबंदी झाले मात्र या रस्त्याचे काम त्यांना करता आले नसल्याचे नीतेश कराळे यांनी सांगितले.
▪️चौकट
माजी खासदार सुजय विखे !
आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले सुजय विखे यांना विद्यमान नव्हे तर माजी खासदार म्हणले तरी चालेल कारण मतदारसंघात तशी परिस्थिती दिसत आहे. तर नीलेश लंके यांना भावी खासदार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
▪️चौकट
खासदार गावात आलेच नाहीत
आपला ग्रामीण भाग असून या भागाच्या संवेदना, अडीअडचणी जाणून घेणारा माणूस संसदेमध्ये त्या मांडू शकतो. जो माणूस पाच वर्षात आपल्याकडे आलाच नाही. लोकही म्हणतात खासदार आमच्याकडे आलेच नाहीत. तुम्ही सर्वसामान्यांमघ्ये गेलेच नाहीत त्यांच्या सुख,दुःखात सामील झाले नाही तर तुम्हाला त्यांचे दुःख कसे कळणार ? ते संसदेत काय मांडणार ? असा सवाल आ. तनपुरे यांनी केला.
▪️चौकट
दिल्लीत जाऊन मुजरा करणारा खासदार हवा का ?
आरडगांव येथे प्रचारानिमित्त गेलो होतो. काही तरूण दुध उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या संवेदना ऐकूण माझ्या डोळयातून पाणी आले. भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे ते तरूण होते. दुध दर कमी झाल्याने दिड लाखांची गाय पन्नास हजार रूपयांना विकली जात आहे. शेतकरी ढसढसा रडतोय, सरकार मात्र त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. आपले खासदार मात्र त्याकडे लक्ष देत नाहीत. दिल्लीला जाऊन मुजरा करतात. दिल्लीपुढे न झुकता स्वाभिमानाने प्रश्न मांडणारा खासदार हवा की मुजरा करणारा खासदार हवा ? अशी टीका आ. तनपुरे यांनी केली.
▪️चौकट
केंद्र व राज्यातील सरकार बदलण्याची वेळी
कांदा निर्यातबंदीबाबत विखे यांनी चेष्ट चालविली आहे. महिनाभर लपाछपी सुरू होती. कांदा उत्पादक मतदारसंघात मतदान आहे म्हणून आता निर्यातबंदी उठविल्याचे सांगितले जात आहे. मुळात कांदा निर्यातीवर बंद आणलीच कशाला ? ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कांदा विकला त्याचा काय हिशेब आहे ? आता ग्रामीण भागाप्रती संवदेना नसणाऱ्या सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ज्या गोष्टींवर चालते त्यालाच हे सरकार लाथडत असेल तर बाकी सर्व मुददे गौण आहेत. ज्यावेळी आमच्या पोटाचा प्रश्न येतो त्यावेळी हे देशातील आणि राज्यातील सरकार बदलण्याची वेळ आली आहे.