सोमवारपासून सुरु होणार शहरातील पहिली प्राथमिक शाळा
सर्व पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याचे दिले संमती पत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर तब्बल दीड वर्षानी शाळा सुरु झाल्या. मात्र शहरात अजूनही प्राथमिक शाळा बंद आहेत. शहरातील कापडबाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या सहविचार सभेत सोमवार (दि.15 नोव्हेंबर) पासून शाळा सुरु करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.
उपस्थित सर्व पालकांनी शाळा सुरु करण्याबाबत व मुलांना शाळेत पाठविण्याचे संमती पत्र भरुन दिले. शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्यात येणार असून, याबाबत बैठकित नियोजन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालक शिक्षक सहविचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, मुख्याध्यापक शिवाजी लंके, जालिंदर सिनारे, राजेंद्र देवकर, इमरान तांबोळी आदींसह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी (दि.13 नोव्हेंबर) दुपारी पालक शिक्षक पालकांची बैठक पार पडली. यामध्ये पालकांनी शाळा सुरु करण्याची मागणी लाऊन धरली. सोमवार पासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला असता सर्व पालकांनी हातवर करुन शाळा सुरु करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.
या बैठकित शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शाळेत येण्याचे नियोजन, कोणत्या वर्गाची कोणत्या दिवशी उपस्थिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्याची खबरदारी याबाबत नियोजन करुन पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, कोरोनानंतर शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष शाळेत शिक्षणाची गरज आहे. या परिस्थितीला सामोरे जाताना शिक्षक व पालकांनी एकमेकांना सहकार्य करुन वाट काढायची आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांच्यामध्ये मोबाईल ऐवजी पुस्तकांची आवड निर्माण करावी.सहज जीवनोपयोगी शिक्षण देऊन संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनी योगदान देण्याचे सांगितले.समजेल अशा भाषेत शिक्षकांनी ज्ञानदान करावे व पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना दिशा देण्याचे वाळुंजकर यांनी सांगितले.
मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी गणित व इंग्रजीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षण द्यावे. इंग्रजी माध्यमांचा ओढा आता मराठी माध्यमांकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इमरान तांबोळी यांची विषय तज्ञ शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला साळुंके यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले. बैठक यशस्वी होण्यासाठी मीनाक्षी खोडदे, शितल रोहकले, इंदुमती दरेकर, जयश्री खंदोडे, सचिन निमसे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.