मोहा शिवारातील लक्ष्मी कलाकेंद्राला परवाना नसल्याने पोलीसांचा छापा, व्यवस्थापका विरोधात गुन्हा दाखल
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण)
जामखेड – जामखेड शहरालगत असलेल्या मोहा गावच्या शिवारात नव्याने व विनापरवाना असलेल्या लक्ष्मी कलाकेंद्रावर पोलीसांनी छापा टाकून कलाकेंद्राचा व्यवस्थापक सुरज बबन मुसळे, (वय-३२ वर्षे, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ (क) (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड पोलीसात पोलीस हेडकॉन्टेबल संजय भाऊसाहेब लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दि. १३ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ सह जामखेड-बीड रोडवरील मोहा गावच्या शिवारात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मोहा शिवारात लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रात विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालु आहेत.
याबाबत माहिती घेतली असता सदरचे कलाकेंद्र नव्याने सुरू झालेले आहे. यामुळे दोन पंचांना बोलावून लक्ष्मी नावाचे कलाकेंद्रात सव्वा नऊचे सुमारास जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या लहान- मोठ्या हॉलमध्ये एकुण १२ नृत्यांगणा व त्यांचे समोर बसलेले ग्राहक इसम यांचे समोर नृत्य करीत असल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी असलेला कलाकेंद्राचा व्यवस्थापक सुरज बबन मुसळे, (वय-३२ वर्षे रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) याकडे कलाकेंदात नृत्याचा कार्यक्रम चालविणेकरीता आवश्यक असलेला परवाना बाबत विचारपूस केली असता त्याने पंचासमक्ष परवाना नसल्याचे सांगितले.
कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना लक्ष्मी नावाचे कलाकेंद्रात विनापरवाना नृत्याचे कार्यक्रम चालविताना आरोपी सुरज बबन मुसळे आढळून आल्याने त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३/१३१ (क) (१) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.