लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाजप सरकार विरोधात निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आंदोलनात हुतात्मे झालेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली

भांडवलदारांच्या हितासाठी कृषि प्रधान देशाची ओळख पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाप्रसंगी वाडियापार्क व परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी स्वयंफुर्तीने दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला.प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना श्रध्दांजली वाहून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.

आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अमोल गाडे, बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, माजी नगरसेवक संजय झिंजे, काँग्रेसचे उबेद शेख, प्रा. अरविंद शिंदे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, फारुक रंगरेज, विजय गव्हाळे, संभाजी पवार, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, अजिंक्य बोरकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, सारंग पंधाडे, मुजाहिद कुरेशी, आरिफ शेख, सुमीत कुलकर्णी, प्रा.निवृत्ती आरु, सुनिता पाचरणे, साधना बोरुडे, सुजाता दिवटे, लहू कराळे, पप्पू पाटील आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने लोकशाहीचा स्तंभ ढासळला.भांडवलदारांच्या हितासाठी कृषिप्रधान देशाची ओळख पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. शांततेत शेतकर्‍यांचा मोर्चा पुढे जात असताना मागून त्यांच्या अंगावर गाड्या घालून शेतकर्‍यांना अमानुषपणे चिरडण्यात आले. या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तर या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या मंत्रीपुत्राला जबाबदार धरुन केंद्रीय गृह राज्य मंत्री मिश्रा यांचा तात्काळ राजीनामा घेणे आवश्यक असून,भाजप विरोधात बोलणार्‍यांमागे विविध चौकशीची ससेमिरा लावण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. माणिक विधाते यांनी देशाचा पोशिंदा व राजा असलेल्या शेतकर्‍यांना लखीमपूरला गाडीखाली चिरडण्यात आले. न्याय, हक्कासाठी बळीराजाला रस्त्यावर येऊन मागील अकरा महिन्यापासून आंदोलन करावे लागत असून, त्यांच्याकडे लक्ष देण्यास केंद्र सरकारला वेळ नसल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला.

अविनाश घुले म्हणाले की, शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्यासाठी लखीमपूरला हिंसाचार घडविण्यात आला. कृषि कायदे मागितले नसताना, शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आले.भांडवलदारांच्या हितासाठी केंद्र सरकार शेतकर्‍यांचे बळी घेत आहे. अकरा महिनापासून दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सातशेपेक्षा जास्त शेतकर्‍यांचे बळी गेले.केंद्रातील हुकुमशाही सरकार मुठभर भांडवलदारांसाठी शेतकर्‍यांना देशोधडीस लावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी बाळासाहेब जगताप, उबेद शेख, प्रा. अरविंद शिंदे, प्रकाश भागानगरे, रेशमा आठरे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!