लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यापासून दूर असलेल्या राज्यकर्त्यांना कायमचे घरी पाठवा
लोकभज्ञाक चळवळीचे आवाहन
सध्याच्या राजकारण्यांचे वागणे प्रत्येक बाबतीत औरंगजेबासारखेच असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यापासून दूर असलेल्या व महात्मा गांधीजी यांच्या लोकभज्ञाक तत्त्वाशी विसंगत वागणाऱ्या राज्यकर्त्यांना कायमचे घरी पाठवणे हाच देशातील जनतेसमोरील राजमार्ग असल्याचे लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर शहराला असलेले औरंगजेबाचे नाव बदलून नामांतर करणाऱ्या सध्याच्या राजकारण्यांचे वागणे प्रत्येक बाबतीत औरंगजेबासारखेच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतात गेली 5 हजार वर्षे लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती या महान तत्वांचा उद्घोष करण्यात आला. महात्मा गांधीजींनी या लोकभज्ञाक तत्त्वातील प्रचंड शक्ती ओळखून इंग्रजांविरुध्द व्यापक आंदोलन केले. त्याचा परिणाम या देशातून इंग्रज गेले, परंतु गेल्या स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात गोरे इंग्रज गेले, परंतु काळ्या अप्पलपोट्या राज्यकर्त्यांनी संपूर्ण देश खाऊन टाकला आहे. कुटुंबाची सत्ता राहण्यासाठी गांधीजींचे तत्व देखील पायदळी तुडविणाऱ्या प्रवृत्तींना सार्वजनिक जीवनातून निवृत्त करणे आणि त्यासाठी त्यांच्या विरुद्ध डिच्चू कावा करणे हाच एक मार्ग मतदारांसमोर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अजित पवारांच्या कोट्यावधीच्या घोटाळ्याबाबत ईडीचा दम देणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोडून आपल्या तंबूत आणले. त्याचबरोबर गांधी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्यांनी सत्तेसाठी त्यांच्या तत्त्वाचा खून केला. अशा घराण्याची सत्ता चालविणाऱ्या अप्पलपोट्या विरुध्द डिच्चूकावा करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हंटले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या मोदी गटात गेल्याबरोबर गृहनिर्माण मंत्री झाले, परंतु त्यांना घरकुल वंचितांना लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे परवडणारी घरे देणे शक्य झाले नाही. त्यांनी याबाबतचा सकारात्मक विचार देखील केला नाही. लोक कल्याण्यापेक्षा मुलाचे पुनर्वसन करणे विखे पाटलांना महत्वाचे वाटले. ध्रुतराष्ट्रने आपल्या मुलांसाठी जे केले, त्यापेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही केले नाही. नगर जिल्ह्यामध्ये सत्ताअप्पलपोट्या ओकांनी खेळवत ठेवली, परंतु लोकांच्या भल्यापेक्षा सत्तेसाठी अनेक कोलांट्याउड्या मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे-अहमदनगर अशी शटल सर्व्हिस रेल्वे गाडी सुद्धा विखे पाटील यांनी सुरू केली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या समोर फक्त लाचारी करून सत्ता कायम ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न आहे. ज्यांनी मतदारांना पैसे वाटले त्यांचा इतिहास मंत्री पदे मिळवण्यासाठी पक्षप्रमुखांना कोट्यावधी रुपये दिल्याचा आहे. देशातील नागरिकांना सोन्याच्या धुराचे आश्वासन देणाऱ्या सध्याचे राज्यकर्त्यांनी लोकभज्ञाक तत्त्वाला तीलांजली दिली आहे. भारत जगाचा नेता होण्यासाठी महात्मा गांधीजींनी राबविलेल्या लोकभज्ञाक तत्त्वाची गरज असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. लोकभज्ञाक चळवळीच्या यशस्वीतेसाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.