करंजी ( प्रतिनिधी ) – ग्रामिण भागातील आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. लोहसर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णांना औषधे दिली जात नाहीत,मात्र मुदत न संपलेली चालू औषधे व गोळ्या फेकून दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. येथुन जवळ असलेल्या करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात मागील काही दिवसापुर्वी लसीकरणाचे काम चालू असतानाच दवाखान्यात आत्महत्या केल्याची घटना घडल्यापासून परिसरातील अनेक गावातील रुग्ण लोहसर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात. परंतू या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कधी हजर राहत नसल्याने या परिसरातील रुग्णांची हेळसांड होते. प्राथमिक आरोग्य केंद्र उघडे असले तर त्यांना औषध, गोळ्या शिल्लक नसल्याचे सांगीतले जाते. या प्रकाराने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दवाखान्याच्या परिसरात पहाणी केली असता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुला मोठया प्रमाणात मुदत असलेली गोळ्या व औषध फेकून दिल्याचा प्रकार आज उघडकीस आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामिण भागातील लोकांमध्ये भितीचे सावट निर्माण झाले असल्याने थोडेफार आलेले दुखणे अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जातात. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुदतीतील चालू औषध फेकून देण्यात आल्याने या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोहसरचे सरपंच अनिल गिते,महादेव गिते, राजेंद्र दगडखैर, गोरक्षनाथ गिते, बाबासाहेब गिते ,बबलू गिते म्हतारदेव रोमन, छबु कापसे, साईनाथ चव्हाण, तुकाराम सानप मेजरसह केली असून जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका आरोग्याधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.
मुदतीत चालु असलेली औषधे व गोळ्या कचऱ्यात फेकून देण्यात येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी आज उजेडात आणला, शासनाचा लाखो रुपयांचे नुकसान झाले, या प्रकाराची चौकशी व्हावी आरोग्य वर्धिनी सेविका रुग्णांना अरेरावी करते त्यामुळे नेहमी रुग्ण तक्रार करतात – अनिल गिते ( सरपंच लोहसर )