वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे नगरला होणार दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
जागतिक कुस्ती पदक विजेते राजकुमार आघाव यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी) – वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नगरला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी जागतिक कुस्ती पदक विजेते राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर आयोजक म्हणून वंजारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मल्हारी खेडकर व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेणुकाताई वराडे (सानप) काम पाहणार आहे. त्यासोबतच उर्वरित स्वागत अध्यक्ष समिती घोषित करुन अयोजन समिती सदस्य यांची देखील निवड केली जाणार आहे.
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व विचारवंत साहित्यिक लेखक गणेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाची माहिती देण्यात आली. यावेळी वंजारी महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
वंजारी समाजाचे पाहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे डिसेंबर 2022 मध्ये पार पडले होते. त्याच वेळी वंजारी समाजातील वैचारिक पोकळी भरून निघावी म्हणून द्विवार्षिक संमेलन अंखडीतपणे परंपरा म्हणून घेण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने दुसरे संमेलन नगरला होत आहे. यजमान म्हणून संपूर्ण वंजारी समाज राहणार आहे.
या संमेलनात सर्व जाती, धर्म व समाजाला आमंत्रित केले जाणार असून, विविध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा पुरस्काराने सन्मान देखील केला जाणार आहे. संमेलनाचे भव्य अयोजन करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन समिती गठित करण्यात येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींना उपस्थित राहण्याबाबातचे निमंत्रण व ऐतिहासिक आयोजन करण्याबाबत वेगवेगळ्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा सुरु आहे.