विखे पाटील फाउंडेशन संचलित नर्सिंग महाविद्यालयातील युवक-युवतींने राबविले स्वच्छता अभियान; स्वच्छ व निरोगी भारत घडविण्याचा संदेश
अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) युवक-युवतींनी वडगाव गुप्ता येथे स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छ भारत अभियानातंर्गत हा उपक्रम राबवून परिसर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. तर स्वच्छ व निरोगी भारत घडविण्याचा संदेश देण्यात आला.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत 50 विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. गावामधील प्लास्टिक, कचरा संकलन करून आरोग्यासाठी स्वच्छतेचा जागर करण्यात आला. या उपक्रमासाठी वडगाव गुप्ताचे लोकनियुक्त सरपंच विजयराव शेवाळे यांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम संस्थेचे उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, प्रभारी महासचिव डॉ. पी.एम. गायकवाड, प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर, प्रसाद काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर म्हणाल्या की, परिसर स्वच्छ असल्यास रोगराई न पसरता नागरिकांचे आरोग्य निरोगी राहणार आहे. निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक असून, याची सुरुवात स्वत:पासून होणे गरजेचे आहे. घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास स्वच्छ भारताचे स्पप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच विजयराव शेवाळे यांनी गावात युवक-युवतींनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक अमित कडू, अमोल टेमकर, सोनाली बोरडे यांनी परिश्रम घेतले.