अल्पवयीन, विना लायसन्स गाडी चालवणार्या वर कारवाई करणार
नेवासा फाटा (प्रतिनिधी ) – रहदारीला अडथळा ठरणाऱ्या बाबींपाठोपाठ भरदाव वेगाने विनापरवाना वेडी वाकडी वाहने चालविणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा जमाल गोटा पाजण्याचा नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांचा निर्णय चांगलाच प्रभावी ठरणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नेवासा शहरातील मुख्य रस्ता असलेल्या नेवासा श्रीरामपूर रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सोडून रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने, हातगाड्या, छत्र्या, पाट्या लावून वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होईल असा प्रकार सुरू होता व तसे स्पष्ट चित्र नेहमीच दिसून येत होते. मात्र पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी स्वतः बस स्थानक ते संपूर्ण श्रीरामपूर रस्त्यावर पायी चालत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापाऱ्यांना तोंडी समज दिल्याचे चित्र पहावयास मिळाले.
नेवासा बस स्थानक व पंचायत समिती समोरच्या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. नेवासा-श्रीरामपूर मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीची वर्दळ देखील मोठी आहे. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडी देखील होत असते. पोलीस निरीक्षक करे यांनी समज दिल्यानंतर नागरिकांमधून कारवाईचे स्वागत करण्यात आले. यानंतर व्यापारी वर्गाने देखील सहकार्याची भूमिका घेत अडथळा निर्माण होणारी नाही याची दक्षता घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नक्की रस्त्यावरील कोंडी होणार नसल्याचा विश्वास लोकांना वाटू लागला आहे.
त्यापाठोपाठच नेवासा शहर व नेवासा फाटा परिसराला भेडसावणारी आणखी एक वाहतूक समस्या म्हणजे रस्त्यावरून भरधाव वेगाने वेडी वाकडी धावणारी वाहने. रेसर दुचाकी गाडी घेऊन अतिवेगाने चालणारे विना लायसन्स, अल्पवयीन मुलांवर यापुढे कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे विना वाहन चालविण्याचा परवाना गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांमुळे नेवासा फाटा व शहर परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले होते परंतु पोलिस निरीक्षक करे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे निश्चितच या अपघातांना आळा बसेल असा सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.