नेवासा (कमलेश गायकवाड ) – मुकींदपूर परिसरातील लोकोपयोगी विकास कामांची जंत्री पाहता जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती असलेला सरपंच काय नाही करू शकत, याची प्रचिती येते. मुकींदपूर गाव परिसरातील विकास गंगेचा भगीरथ म्हणून लोकनियुक्त सरपंच सतिष दादा निपुंगे यांचा उल्लेख केला तर तो वावगा ठरू नये.
नेवासा तालुक्यात तुलनेने सर्वात मोठे समजले जाणारे मुकींदपूर हे गाव नगर-औरंगाबाद महामार्गालगत वसलेले असून विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांमुळे अतिशय विकसित बनले आहे. वर्षागणिक येथे वाढत जाणारे उद्योग धंदे तसेच शाळा, दवाखाने आणि त्याअनुषंगाने वाढत जाणारी लोकवस्ती या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर कल्पक, दुरदृष्टीच्या नेतृत्वाची गरज निर्माण झाली होती.
१२ सदस्य संख्या असलेल्या मुकींदपूर ग्रामपंचायतीत तरुण, तडफदार युवा नेतृत्व समजल्या जाणारे सतिष दादा निपुंगे लोकनियुक्त सरपंच झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या परिसराने कात टाकल्याचे नमूद केले तर ते वावगे ठरू नये. सरपंच पदाच्या कारकिर्दीत निपुंगे यांनी आखीव रेखीव, नियोजनबद्ध विकास कामे करून तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सत्तेच्या राजकारणाचा पूर्वानुभव नसतानाही अत्यंत कमी वयात मुकींदपूर सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीची सूत्रे हातात घेऊन व त्या पदाला साजेसा कारभार करून त्यांनी तालुक्यातील नवीन गावकारभाऱ्यांना विकासाची नवी दिशा दाखवून दिली आहे.
निपुंगे यांनी मुकींदपूर परिसरात वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सोयी-सुविधांना विशेष प्राधान्य दिले. त्यासाठी त्यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावून प्रचंड निधी खेचून आणला. विकास कामांचा दर्जा राखण्यासाठी त्यांनी संबंधितांना स्पष्ट सूचना देऊन यात तडजोड केली नसल्याने मुकींदपूर परिसराचा अल्पावधीतच कायापालट झाला आहे.
नेवासा तालुक्यात सर्वात जास्त विकासकामे मुकींदपूरला झाली आहेत. निपुंगे आपली कल्पकता वापरून विकासकामांचे प्रस्ताव शासनदरबारी पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात तरबेज समजले जातात. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे मुकींदपूर परिसरातील विकास गंगेचा भगीरथ म्हणून ग्रामस्थ कौतुकाने नामोल्लेख करताना दिसतात.