नेवासा प्रतिनिधी – नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार परत एकदा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने तालुक्याच्या विविध स्तरांतून समाधान व्यक्त होत असून अनेकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्तीस असताना पोलीस निरीक्षक विजय करे यांनी त्यांच्या कार्यशैलीने सामान्य जनता व पोलीस प्रशासनातील दरी कमी केली होती.त्यांच्या कार्यतत्पर, कर्तव्यकठोर तसेच लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने पोलीस ठाण्याची पायरी चढत होते. करे यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप लावून गुन्हेगारीलाही लगाम घातल्याने एरवी संवेदनशील समजला जाणाऱ्या नेवासा परिसरात कायदा-सुव्यवस्था परिस्थितीचे अस्तित्व जाणवू लागले होते.
मात्र त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे दुकानदारी बंद झालेल्या काहींनी कुभांड रचून त्यांच्यावर ठपका ठेवल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांची नगरला मुख्यालयात बदली केली होती. मात्र त्यांच्या चौकशीत करे कुठेही दोषी आढळले नाहीत. योगायोगाने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवारही वादग्रस्त ठरल्याने त्य़ांना हटवून करे यांची पुनर्नियुक्ती करण्याची मागणी तालुक्यातून होत होती.
लोकभावनेचा आदर ठेवत जिल्हा पोलीस प्रमुखांनी बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवत विजय करे यांची नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी संध्याकाळी नेवासा पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली आहेत.