विद्यार्थी पालकांकडे करणार मतदानाचा आग्रह
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान
घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवूच्या घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना घरच्या मंडळींना मतदानासाठी आग्रह धरण्याचा व त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आई-बाबा, आजी-आजोबा व कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी आग्रह करणार असल्याचा संकल्प केला. जना मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार…, घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवू… अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.
मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ उपस्थित होत्या.
अनिता काळे म्हणाल्या की, शंभर टक्के मतदान झाल्यास योग्य उमेदवार निवडून येणार आहे. नागरिकांचा मतदान प्रक्रियेत पूर्णत: सहभाग वाढल्यास लोकशाही बळकट होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मतदान करण्यासाठी आग्रह करण्याचे स्पष्ट करुन त्यांना मतदानाचे महत्त्व विशद करण्यात आले.