जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने
ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन
विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईमुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट
अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शेतकर्यांचे वीज बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम विद्युत महावितरणकडून होत असून,या कारवाईचा सर्वच शेतकर्यांना फटका बसत असल्याने विद्युत महावितरणने नवीन धोरण स्विकारण्याची मागणी माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

शेतकर्यांचे २०२१ पर्यत थकित असलेले सर्व वीज बिल माफ करावे.नवीन धोरणानूसार त्यांना मोफत नवीन कनेक्शन व मिटर द्यावे,चोवीस तास लाईटची व्यवस्था करावी, दरमहा बील द्यावे,जे शेतकरी वीज बिल भरतील त्यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, वीज बिल न भरणार्या शेतकर्यांचे वीज कट करण्याची तरतुद नवीन धोरणात राबविण्याची गरज असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षी अचानक शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट करुन बिल आकारणी केली जाते.डिपी नुसार पैसे जमा केले जातात.बिलाची रक्कम कमी होत नाही,मात्र लाईट रात्री जास्त दाबाने तर दिवसा कमी दाबाने सोडली जाते.डिपी व इतर दुरूस्ती करायची असल्यास शेतकर्यांना पैसे जमा करावे लागतात.एका डिपीवर जास्त कनेक्शन असल्यास विजेचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने मोटार पंप चालत नसल्याचा त्रास शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.
विद्युत महावितरणकडून बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे सुरु असलेल्या कारवाईमुळे शेतकर्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.प्रत्येक गावातील घराच्या संख्याप्रमाणे नवीन मिटर द्यावे,प्रत्येक विहीरीवर नविन मोफत वीज कनेक्शन द्यावे व कनेक्शनच्या संख्यानुसार डिपी बसवावी या सुविधा देऊन मग कारवाईचा बडगा उगारण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
विद्युत महावितरणकडून शेतकर्यांना पुरेश्या सुविधा मिळत नसून, बिलासाठी मात्र कठोर कारवाई केली जात आहे. बिल भरणार्या शेतकर्यांमुळे नियमीत बिल भरणारे शेतकरी देखील भरडले जात आहे.
यासाठी विद्युत महावितरणने नवीन धोरण राबविण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.यामुळे विद्युत महावितरणच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी देखील सुखावला जाणार असल्याचे म्हंटले आहे.