विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ घुले याचा शाळेच्या वतीने सन्मान
घुलेची यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -प्रा. शिवाजी विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी आजिनाथ भीमसेन घुले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करुन पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते यांच्या हस्ते घुले याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मयूर विधाते, विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, बाळासाहेब विधाते, वैभव शिंदे, भिवसेन घुले आदींसह सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. शिवाजी विधाते म्हणाले की, आजिनाथ घुले याने मिळवलेले यश शाळेच्या दृष्टीकोनाने अभिमानास्पद आहे. त्याचे वडिल हमाली तर आई ऊस तोडीचे काम करत असून बिकट परिस्थितीत त्याने जिद्द व कठोर परिश्रमाने यश मिळवले आहे. त्याची यशोगाथा ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी घुले याचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना आजिनाथ घुले याने लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न होते. शालेय जीवनात शिक्षकांनी ज्या पध्दतीने घडविले त्याचा भविष्याच्या वाटचालीत मोठा उपयोग झाला. पंखात बळ निर्माण करण्याचे काम शिक्षक करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
- Advertisement -