शहरात कामगार वर्गाची मोफत हृद्यरोग तपासणी
एस.डी.ए. मेन चर्च व शांतीपूर चर्चच्या वतीने महाराष्ट्र व कामगार दिनाचा उपक्रम
आनंदी हृद्य हेच निरोगी जीवनाचे औषध -प्रकाश थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सर्वसामान्य कामगार वर्गाची मोफत आनंदी हृद्यरोग तपासणी करण्यात आली. एस.डी.ए. मेन चर्च व शांतीपूर चर्चच्या वतीने शहरातील कोठी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरास कामगार वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. महेश जरे, डॉ. सुदिन जाधव, आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप पवार, धर्मगुरु अरुण जगताप, उज्वल कांदणे, सॉलोमन बोरगे, नितीन जगधने, डेव्हिड अवचिते, डॅनियल भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, आनंदी हृद्य हेच निरोगी जीवनाचे औषध आहे. मानसिक तणाव व चूकीच्या जीवनशैलीमुळे अनेक दुर्धर आजार जडत आहे. यासाठी वेळोवेळी तपासणी महत्त्वाची असून, मोफत शिबिर सर्वसामान्य कामगार वर्गासाठी आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. महेश जरे यांनी आजार झाल्यावर अनेक समस्या निर्माण होतात, उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात असलेला खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो. वेळोवेळी तपासणीने वेळीच आजारापासून मुक्तता मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. अरुण जगताप म्हणाले की, कामगार वर्ग धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. सर्वसामान्य कामगार वर्गामध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तणावपूर्ण जीवनशैली, चूकीची आहार पध्दती व व्यायामाच्या अभावामुळे ह्रद्यरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. या शिबिरात रुग्णांची मोफत हृद्यरोग तपासणी करुन त्यांना पुढील उपचारासाठी सवलत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर हृद्यरोग टाळण्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.