शहरात दिव्यांगासाठी शाळा पूर्व वर्ग सुरू, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठीचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत बालसुधारगृहाच्या केंद्रात शाळा पूर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्राचार्य राजेंद्र बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कौशल्यावर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यां ची सद्यस्थिती लक्षात घेत त्याचे उद्दिष्ट ठरविण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांना अध्यापन सहाय्य आणि पालक समुपदेशन केले जाणार असल्याचे केंद्राचे विशेष शिक्षक उमेश शिंदे यांनी सांगितले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी फायदेशीर असल्याचे मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी सांगितले. या उपक्रमासाठी समन्वयक महेश क्षीरसागर, विशेष तज्ञ शरद पवार, शशिकांत गीते यांचे सहकार्य लाभले.