शहरात योग, निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जीवन निरोगी व आनंददायी बनविण्यासाठी निसर्गोपचार व योग सर्वोत्तम पर्याय -डॉ. ऐश्वर्या शहा (देवी)
अहमदनगर (प्रतिनिधी)- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे संचलित आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या योग, निसर्गोपचार पदविका प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरास महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. हेमांगिनी पोत्नीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. हेमा सेलोत, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम पानसंबाळ, डॉ. पद्माकर रासवे, डॉ. गणेश तनपुरे, वर्षा झंवर, डॉ. ऐश्वर्या शहा (देवी), डॉ. साक्षी मेहतानी, डॉ. शुभी आगरवाल, डॉ. भारती दौलतानी, अनील मेहेर, शुक्ला मुथा आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. ऐश्वर्या शहा (देवी) म्हणाल्या की, जीवन निरोगी व आनंददायी बनविण्यासाठी निसर्गोपचार व योग सर्वोत्तम पर्याय आहे. याचे ज्ञान आजच्या युवा पिढीला देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निसर्गोपचारद्वारे खुलविण्यात येणारे सौंदर्य, आहारातून उपचार पध्दती, मसाज थेरपी व दैनंदिन आरोग्यासाठी योग्य आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. हेमा सेलोत म्हणाल्या की, निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार हेच औषध आहे. ऋतुमानानुसार योग्य वेळी योग्य आहार गरजेचा आहे. कोणत्या ऋतुमध्ये कोणाता आहार व कसा घ्यावा? याची माहिती नसल्याने शरीरात अनेक व्याधी निर्माण होत आहे. याचे परिपूर्ण ज्ञान निसर्गोपचार शास्त्रात शिकवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. हेमांगिनी पोत्नीस यांनी आहारातून मिळणारे औषधी गुणधर्म अनेक विकारांवर मात करतात. 70 टक्के चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजार उद्भवत असून, आजाराच्या दृष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी योग निसर्गोपचाराचा प्रचार-प्रसार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विक्रम पानसंबाळ यांनी आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून योग व निसर्गोपचाराच्या प्रचारासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आभार तनपुरे यांनी मानले.
- Advertisement -