कोरोना प्रतिबंधासाठी लघुपटातून जनजागृती
अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटानंतर भविष्यात शाळा उघडल्यावर पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कशी खबरदारी घ्यावी? या विषयाच्या जनजागृतीसाठी नगरच्या कलाकारांनी साकारलेल्या मास्क या लघुपटाचे अनावरण नगरसेवक बाळासाहेब बोराटे व उद्योजक प्रदीप पंजाबी यांच्या हस्ते कण्यात आले.
नुकतीच शाळा सुरु झाली असून, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी व नियमांचे पालन कसे करावे? याबद्दल लघुपटाच्या माध्यमातून विविध संदेश देण्यात आले आहेत.
तेज वार्ता फिल्म प्रोडक्शन हाऊस व बी.बी. फिल्म प्रोडक्शन हाऊसने या लघुपटाची निर्मिती केली आहे.मास्क या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांनी केले आहे.
या लघुपटामध्ये राजू जहागीरदार, सौम्या खरमाळे, वासिम शेख, मनस्वी चोथे, सैफ पठाण, दर्श पाडळे, अमीर पठाण, सृष्टी उदमळे, अलिना खान, अनन्या इथापे, अस्लम शेख, मुदस्सर शेख, अशोक पायमोडे, मोईन शेख, वर्षा चोथे, गौरव दिवाण, मुस्कान शेख या नगरच्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की, कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर शाळा उघडल्या आहेत. शाळा अखंडितपणे सुरु राहण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन, कोरोना संक्रमण टाळण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने नगरच्या कलाकारांनी साकारलेला मास्क दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप पंजाबी यांनी लघुपट समाज जागृतीचे मोठे माध्यम आहे. या संकटकाळात कलाकारांनी सामाजिक भावनेने जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे सांगितले.शाळा सुरु झाल्या असून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा सामाजिक विषय हाताळण्यात आला असल्याची माहिती लघुपटाचे लेखक तथा दिग्दर्शक भैय्या बॉक्सर यांनी दिली.