शासनाने केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाविरोधात केली घोषणाबाजी

0
113

अहमदनगर प्रतिनिधी –  जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीला आणि त्यामध्ये झालेल्या मृत्यूला जबाबदार धरून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह एकूण सहा जणांना निलंबित आणि सेवानिवृत्तीचा आदेश काढल्यामुळे आज अहमदनगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णया विरोधात घोषणाबाजी केली.

या कारवाईमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये कार्यरत असलेल्या तीन परिचरिकांचा समावेश असल्याने शासनाने केलेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचे सांगत,आज मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी आरोग्य कर्मचारी यांनी सांगितले की अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी ही वरिष्ठांची आणि त्या स्तरावरील विभागांची असते.

मात्र अचानक आग लागल्यानंतर त्यास जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे,सेवा समाप्ती करणे  हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे निलंबन/सेवा समाप्ती कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी,अन्यथा राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आवाज उठवतील आंदोलन करतील.त्याचबरोबर यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल असा इशारा या वेळी देण्यात आलेला आहे.

या निषेध सभेनंतर सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही कार्यरत असणार आहोत.मात्र अन्यायकारक पद्धतीने झालेल्या निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी अशी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोरोनाच्या काळामध्ये शासकीय परिचारिकांनी अहोरात्र काम केले असून अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे.नातेवाईकांसोबत थांबण्यास मज्जाव असताना आपल्या जीवावर उदार होऊन परिचारिकांनी काम केलेले आहे.या कामाचे कौतुकही करण्यात येत असताना आता दुसर्याच्या चुकीची शिक्षा परिचरिकांना देणे चुकीचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here