शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे वेतनपथक अधिक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे नियमित वेतन, वैद्यकिये बिले, पीएफ प्रकरणे, शालार्थ आयडी प्रकरणे, महागाई भत्त्याच्या फरकासह नियमित देयके व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्यांचे पीएफ प्रकरणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतनपथक अधिक्षक स्वाती हवेले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, रामदास जंजिरे, बाळासाहेब चांडे, डी.एस. आंबेकर, बाळू सुर्यवंशी, एस.एम. वसावे, सतीश म्हस्के आदी शिक्षक उपस्थित होते.
शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे नियमित वेतन, वैद्यकिये बिले, पीएफ प्रकरणे, शालार्थ आयडी प्रकरणे, महागाई भत्त्याच्या फरकासह नियमित देयके व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्यांचे पीएफ प्रकरणांचा प्रश्न उपस्थित करुन वेतनपथक अधिक्षक हवेले यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेत हवेले यांनी सदर मागण्यांची तत्काळ दखल घेवून सर्वतोपरी सहकार्य करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ऑगस्ट 2021 अखेर कार्यालयात जमा प्रस्तावांची कार्यवाही पूर्ण झाली असून, अग्रीम रक्कम बँकेत वर्ग झालेली आहे. उर्वरीत शाळांचे सप्टेंबरचे वेतन संबंधितांच्या खात्यात दोन दिवसाच्या आत जमा होतील.
वैद्यकिय देयके मार्च 2021 पासून कार्यालयात जमा असून, सद्यस्थितीत साधारण सर्व बिलांसाठी 8 कोटी रुपयांची आवश्यकता असून अनुदानाअभावी ते प्रलंबित आहेत. या निधीसाठी शासनाकडे मागणी केली असून, पाठपुरावा सुरु आहे. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे ऑगस्ट अखेरचे सर्व देयके अदा करण्यात आले आहे.
पीएफची परतावा प्रकरणे ऑगस्ट अखेरची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली आहे. शालार्थ आयडी प्रस्तावांची कार्यवाही सुरु असून, सर्व प्रकरणे लवकरच पूर्ण होणार आहे. महागाई भत्ता फरकसाठी शासन परिपत्रक प्राप्त झाले असून, महागाई भत्यासह सर्व देयके व तांत्रिक अडचणीमुळे ऑगस्ट महिन्याचे काही कर्मचार्यांचे थकित वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचे आश्वासन वेतनपथक अधिक्षक हवेले यांनी यावेळी दिले.