शिवाजीयन्स बी संघाने पटकाविला डॉन बॉस्को फुटबॉल चषक
सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगली होती फुटबॉल स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉन बॉस्को फुटबॉल चषक फिरोदिया शिवाजीयन्स बी संघ विजयी ठरला. मागील पाच दिवसापासून चर्चच्या मैदानात फ्लड लाईटमध्ये स्पर्धेचा थरार रंगला होता. स्पर्धेत तब्बल 21 संघांनी सहभाग नोंदवला.
अंतिम सामना फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स बी संघात झाला. यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन फिरोदिया शिवाजीयन्स बी संघाने विजय संपादन केले. डॉन बॉस्को फुटबॉल कप 2024 आयोजन समितीचे चेअरमन फादर विश्वास परेरा, मिसेस नंदिता डिसोजा, कर्नल डीप्टी कमांडंट रेजी मॅथ्यू, अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनप ॲलेक्स फर्नांडीस, नितीन गवळी यांच्या हस्ते विजेत्या फिरोदिया शिवाजीयन्स बी संघास चषक 15 हजार रुपये रोख, मेडल, उपविजेत्या शिवाजीयन्स अकॅडमी संघास 10 रुपये रोख, चषक व मेडल तर तृतीय क्रमांकाच्या गुलमोहर फुटबॉल क्लब संघाला 5 हजार रुपये रोख चषक व मेडल प्रदान करण्यात आले.
फादर विश्वास पेरेरा यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सेंट जॉन्स चर्चच्या माध्यमातून युवकांना मैदानाकडे वळविण्यासाठी विविध फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे स्पष्ट करुन खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट खेळाचे त्यांनी प्रदर्शन केले. या स्पर्धेसाठी आरमड स्टॅटिक वर्कशॉपचे कमांडंट कर्नल विक्रम निखरा व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालीद सय्यद यांचे विशेष योगदान लाभले. यावेळी महिला रेफ्री प्रियंका आवारे, सोनिया दासोनी तसेच जॉय जोसेफ, अभिजीत निकलसन, अभिषेक सोनवणे या पंचांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभय साळवे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, विक्टर जोसेफ आदींसह सेंट जॉन्स चर्च फुटबॉल कोअर कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.