शेताच्या बांधावर चिमुकलीच्या हस्ते वृक्षरोपण
पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा उपक्रम
लहानपणापासून ते म्हातारपणाच्या आधार पर्यंत मानवाला झाडांची साथ -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी नातीच्या हस्ते वाळकी (ता. नगर) येथील शेताच्या बांधावर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दरवर्षी एक झाड लाऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
भालसिंग यांनी या अभियानाची सुरुवात स्वत:च्या कुटुंबापासूनच केली असून, व्यापक प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. भालसिंग म्हणाले की, प्राचीनकाळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पुर्तता निसर्गाने पूर्ण केली आहे. मात्र मनुष्याने स्वत:चा विकास साधताना निसर्गाची हानी केली. त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लहानपणाच्या पांगुळगाड्यापासून ते म्हातारपणाच्या आधार असलेल्या काठीपर्यंन्त झाडांनी मानवाला साथ दिली आहे. झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. शिवश्री जगताप या चिमुकलीने लावलेल्या झाडांना पाणी देऊन त्याचे संवर्धन करणार असल्याचे व घराच्या अंगणातही झाड लावण्याचा संकल्प केला.