शेताच्या बांधावर पर्यावरण दिनी वृक्षरोपण
गावोगावी एक हजार झाडे लाऊन त्याचे संवर्धन करणार – सुनिल सकट
अहमदनगर (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांनी वांबोरी (ता. नगर) येथील शेताच्या बांधावर वृक्षरोपण अभियान राबविले. तर शेतकरी तथा निवृत्त शिक्षक रोहिदास ससाणे व बाळासाहेब थोरात यांनी लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली.
शेतीच्या बांधावर चिंच, लिंब, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली. सुनिल सकट म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार आहे.
औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासह पशु-प्राण्यांना हानी पोहचवत आहे. प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करुन गावोगावी एक हजार झाडे लाऊन ते जगविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.