शेतात विद्युत टॉवर उभारण्यास विरोध केल्याने मारहाण केल्याची दिव्यांग शेतकऱ्याची तक्रार
संबंधित महापारेषणाचे अधिकारी व पोलीस कर्मचारीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतात विद्युत टॉवर उभारण्यास विरोध केल्याने महापारेषण कंपनीचे अधिकारी व नेवासा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करुन हिनावल्याची तक्रार सौंदाळा (ता. नेवासा) येथील दिव्यांग शेतकरी आदित्य ठुबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
आदित्य ठुबे हे शारीरिक दृष्ट्या 74 टक्के अपंग आहेत. त्यांची सौंदाळा (ता. नेवासा) येथे शेतजमीन असून, त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. 22 मे रोजी भाऊ महेश ठुबे यांच्याबरोबर ते शेतामध्ये असताना महापारेषण कंपनीचे अधिकारी व नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बेकायदेशीर शेतात आले. त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी अरेरावीची भाषा करून शेतामध्ये विद्युत टावर उभारणार असल्याचे सांगितले. याबाबत कोणतीही पूर्व सूचना व नोटीस देण्यात आलेली नाही. शेताच्या मधोमध विद्युत टॉवर उभारल्यास शेती करणे, मशागत करणे अवघड होणार व धोका देखील निर्माण होणार आहे. यामुळे टॉवर उभारण्यास ठुबे यांनी हरकत घेतली. यावेळी अधिकारी वर्गाला विरोध केल्याने त्यांनी भावासह मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
संबंधितांनी शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असल्याने हिनावले व अपमानित केले. याप्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्यावर पोलीस निरीक्षक यांनी तक्रार न घेता तेथून काढून दिले. अधिकारी वर्ग पोलीस प्रशासनाला हताशी धरून दहशत निर्माण करत असल्याचा आरोप ठुबे यांनी केला आहे. याप्रकरणी दिव्यांग अधिनियम कायदा 2016 अन्वये संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवून, ॲट्रॉसिटीचे लावण्याची मागणी दिव्यांग ठुबे यांनी केली आहे.