शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा दीक्षांत समारंभ

श्री.शरद पवार व श्री.नितीन गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

अहमदनगर :- कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचं काम देशाच्या शेती क्षेत्रानं केलं आहे. तेव्हा शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. असे मत राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ आज रोजी पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रिये रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादाजी भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील,अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ उपस्थित होते. यावेळी खासदार शरद पवार आणि श्री.नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची वाटचाल विकासाकडे होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी आपल्या मराठी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.असे ही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

श्री.शरद पवार व श्री.नितीन गडकरी यांनी कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम केले आहे. त्यांना देण्यात आलेल्या डी.एस्सी पदवींमुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. असे गौरवोद्गार ही श्री.कोश्यारी यांनी काढले.

कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठातील बहुतेक विद्यार्थी प्रशासनात मोठ्या पदापर्यंत जातात. अशा उच्च पदावरील विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील प्रश्न, समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तळमळ ठेवावी.आज पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के महिला होत्या. ही प्रशंसनीय बाब आहे.

सेंद्रीय शेती, प्रक्रीया उद्योग व विपणन यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहेत. फळबाग लागवडीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. यात कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे.

श्री.राठौड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला जाणार आहे. कृषी शिक्षणात माहिती- तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा अंगीकार करत विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनावर भर दिला पाहिजे.

पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण ११ हजार ४६८ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात आले. त्यात विविध विद्याशाखातील दहा हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर १०४ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित करण्यात आले. यावेळी विविध शाखेतील यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिके प्राप्त स्नातक व आचार्य पदवी प्राप्त स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांनी विद्यापीठाचा कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, कृषी विद्यापीठानं नोकरी प्राप्त करणारे विद्यार्थी जसे घडविले तसे नोकरी देणारी उद्योजक ही घडविले.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमास विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी महाविद्यालयातील प्राचार्य, अधिष्ठाता व विद्यार्थी सहभागी झाले होते. या समारंभासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली.

*मराठीचा आग्रह*

राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा मराठी भाषेचा आग्रह दिसून आला. आजच्या दीक्षांत समारंभ प्रास्ताविक सुरू असतांनाच त्यांनी कुलगुरूंना पुढील प्रास्ताविक व कार्यक्रम मराठी भाषेत करण्याच्या सूचना केल्या.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!