संघटित नसल्याने ख्रिश्चन समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजावर अन्याय -डॉ. भास्कर रणनवरे
ख्रिश्चन समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दशा आणि दिशा यावर चर्चा
बहुजन मुक्ती पार्टीचेचे उमेदवार रावसाहेब काळे यांना भारतीय मूलनिवासी ख्रिश्चन मोर्चाच्या वतीने पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- संघटित नसल्याने ख्रिश्चन समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. सर्व धर्मियांना राज्य घटनेने समान अधिकार दिलेला असताना ठराविक धर्मियांवर त्यांचा धर्म आचरण करण्यास बंधने आनली जात असून, ही लोकशाहीची पायमल्ली आहे. अशा जातीयवादी प्रवृत्ती, राजकीय पक्ष व सत्ताधारी यांच्याशी एकजुटीने लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भास्कर रणनवरे यांनी केले.
शहरातील रहेमत सुलतान सभागृहात भारतीय मूलनिवासी ख्रिश्चन मोर्चाची बैठक भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ख्रिश्चन समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दशा आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रणनवरे बोलत होते. यावेळी ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रेव्ह. अजयराव देठे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, डॉ. रमेश वाघमारे, रेव्ह. विश्वास काकडे, पास्टर प्रेम देठे, विजय काकडे, योगेश मिरपगार, आकाश शिंदे, सोमेश वाघमारे, प्रज्वल पटेकर, किरण पगारे, सचिन केदारे, सचिन देठे आदी उपस्थित होते.
सुभाष आल्हाट म्हणाले की, देशात सर्व धर्मियांना समान पध्दतीने धर्माचे आचरण व धर्म प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र ख्रिश्चन, मुस्लिम, शीख व इतर अल्पसंख्यांक धर्मियांना टार्गेट करण्याचे काम केले जात आहे. सर्व धर्मिय शांततेच्या मार्गाने आपले आचरण करत असून, राजकीय सत्तेसाठी धर्मा-धर्मात द्वेष पसरविण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थितांनी यावेळी सत्तेसाठी देशात असहिष्णुता पसरविण्याचे काम भाजपकडून होत असल्याचा आरोप करुन; संविधान धोक्यात आणून हुकुमशाही प्रस्थापित करण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे सांगितले.
या बैठकीसाठी जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातील चर्चचे पास्टर यांनी हजेरी लावली होती. बहुजन मुक्ती पार्टीचे नगर (दक्षिण) चे उमेदवार रावसाहेब काळे पाटील यांना भारतीय मूलनिवासी ख्रिश्चन मोर्चाच्या वतीने पाठिंबा देवून त्यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.