संदिप डोंगरे यांने गाजवले नगर तालुक्यातील कुस्ती मैदान
विविध कुस्ती हगाम्यात पै. नाना डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील विविध गावांच्या यात्रोत्सवानिमित्त झालेल्या कुस्ती हगामा व मैदान निमगाव वाघा (ता. नगर) येथील पैलवान संदिप डोंगरे यांनी गाजवले. उत्कृष्ट खेळ करुन डाव-प्रतिडाव करुन केलेल्या चितपट कुस्त्यांमुळे डोंगरे यांच्यावर आयोजकांसह ग्रामस्थांनी बक्षिसांचा वर्षाव केला. तर कुस्ती क्षेत्राला चालना देऊन नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे काम करणारे नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा विविध कुस्ती हगाम्यात सन्मान करण्यात आला.
निंबळक, नेप्ती, चास, कापूरवाडी, निमगाव वाघा आदी गावातील कुस्ती हगाम्यात संदिप डोंगरे याने चितपट कुस्ती करुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डाव-प्रतिडावाने आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली. तसेच नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे विविध स्पर्धेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देत आहे. अनेक ग्रामीण भागातील मल्लांना त्यांनी पुढे आनले आहे. त्यांच्या या कार्याचा विविध कुस्ती हगाम्यात सत्कार करुन गौरव करण्यात आला. उद्योजक माधवराव लामखडे, अजय लामखडे, संजय जपकर, युवराज कार्ले, राधाकृष्ण वाळूंज, वसंत पवार, दादू चौगुले यांनी डोंगरे यांचा सत्कार केला.