संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण
देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -प्रकाश थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने महाराष्ट्र दिनी हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन महाराष्ट्राचा जयघोष करण्यात आला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी उप महाव्यवस्थापक रावसाहेब रंधवे, पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, आधार सामाजिक संघटनेचे संदीप पवार, सुनिल भोसले, अशोक भोसले आदी उपस्थित होते.
प्रकाश थोरात म्हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्मे झाले. त्यांना नमन करुन महाराष्ट्र दिन साजरा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रावसाहेब रंधवे यांनी देशाच्या जडण-घडणीमध्ये महाराष्ट्राने मोठा वाटा उचलला आहे. सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र देशाचा कणा बनला असल्याचे त्यांनी सांगितले.